खाकी वर्दीचा धाक दाखवून वसुलीचे आरोप; नागरिकांच्या रक्षणकर्त्यांवरच प्रश्नचिन्ह!
पुणे पोलीस दलात खळबळ उडवणारी धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत. खाकी वर्दीचा धाक दाखवून पैशांची मागणी, तपासात कथित आर्थिक व्यवहार आणि अल्पवयीन मुलाला मारहाण अशा गंभीर आरोपांमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारत सलग दुसऱ्या दिवशी आणखी चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. अवघ्या दोन दिवसांत आठ पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
दोन लाखांच्या कथित मागणीने खळबळ
बंडगार्डन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमोल धुमाळ आणि पोलीस हवालदार तुषार आल्हाट यांच्यावर दोन लाख रुपयांच्या कथित मागणीप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एका हॉटेलविरोधातील गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींची संख्या कमी करण्यासाठी दोन बोटांचे संकेत देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोन बोटांचा अर्थ दोन लाख रुपये असल्याचे हॉटेल मॅनेजरला सांगण्यात आल्याची माहिती समोर आली. वरिष्ठांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर दोघांवर कारवाई करण्यात आली.
महामार्गावर कंटेनर चालकाकडे पाच हजारांची मागणी
पोलीस मुख्यालयात नियुक्ती असतानाही मुंबई-बेंगळुरू महामार्गावर गणवेशात थांबून कंटेनर चालकाकडे पाच हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप पोलीस शिपाई बाबुराव पोपट ढोले यांच्यावर आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले.
अल्पवयीन मुलाला मारहाण; हवालदारावर कारवाई
मांजरी परिसरात अल्पवयीन मुलाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणात लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राहुल चौधरी यांना निलंबित करण्यात आले आहे.
निलंबनाचा बडगा; पण कायमस्वरूपी उपाय कधी?
नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांवरच अशा गंभीर स्वरूपाचे आरोप समोर येणे ही चिंतेची बाब आहे. पोलीस आयुक्तांनी केलेल्या कारवाईचे स्वागत होत असले, तरी केवळ निलंबन करून प्रश्न सुटणार नाहीत. संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.
खाकी वर्दी ही जनतेच्या संरक्षणासाठी आहे की तिचा वापर दबाव आणि वसुलीसाठी होत आहे? दोन दिवसांत आठ निलंबनांच्या घटनांनी हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.



