रोहीत पवारांच्या पुढाकाराला शेतकरी, वारकरी आणि मच्छिमारांचा प्रतिसाद
सोलापूर – उजनी धरणावर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित AI डेटा सेंटर, सोलर, अनुऊर्जा प्रकल्प (SMR) आणि ग्रीन हायड्रोजन या प्रकल्पांविरोधात पुणे, सोलापूर, अहिल्यानगर आणि धाराशीव जिल्ह्यातील शेतकरी, वारकरी आणि मच्छिमार यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर रांजणी चौकात केलेल्या रास्ता रोको आंदोलनाला उपस्थित राहून संवाद साधला. हे सर्व प्रकल्प शेती आणि मच्छिमारांच्या मुळावर उठणारे प्रदूषणकारी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांचे अत्यंत दूरगामी विपरित परिणाम भविष्यात सहन करावे लागतील. AI डेटा सेंटरसाठी तब्बल 9 TMC पाणी लागणार असून यातून नव्याने रोजगार निर्मितीही होणार नाहीत आणि शेतीही उद्धस्त होईल. असे प्रदूषणकारी प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारले जात असून लाखो रोजगार निर्माण करणारे सेमी कंडक्टरसारखे प्रकल्प मात्र गुजरातला पळवले जातायेत. याविरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप असून या रास्ता रोकोच्या माध्यमातून हाच संताप आज रस्त्यावर दिसला.

जनसुनावणीच्या माध्यमातून लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय इथं कोणताही प्रकल्प होणार नाही असं आश्वासन यावेळी प्रशासनाच्यावतीने देण्यात आलं. भविष्यात सरकारने हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर यापेक्षाही मोठं जनआंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ज्येष्ठ नेते महादेव जानकर साहेब, खा. धैर्यशील मोहिते पाटील, नारायणआबा पाटील, मा. आ. संजयमामा शिंदे, आ. अभिजित पाटील, नवनिर्वाचित आ. डॉ. प्रतापसिंह पाटील, अनिकेत देशमुख, शितलदेवी ताई, संजयबाबा कोकाटे, सुभाष आबा गुळवे, ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर, महारुद्र पाटील, दिग्विजय बागल, नंदकुमार नगरे, सिताराम नगरे, निलेश देवकर, ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक मंडळी, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि धाराशीव जिल्ह्यातील शेतकरी, स्थानिक मच्छिमार यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.




