स्थानिक गुन्हे शाखेची इंचगाव टोलनाक्याजवळ कारवाई; स्विफ्ट कार आणि मोबाईलही जप्त
सोलापूर (प् अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करीविरोधात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली आहे. सोलापूर-मिरज महामार्गावरील इंचगाव टोलनाक्याजवळ सापळा रचून पोलिसांनी गांजा वाहतूक करणाऱ्या शुभम लालासाहेब काळे (वय २८) याला अटक केली. त्याच्याकडून तब्बल १७ किलो ९९४ ग्रॅम गांजा, एक स्विफ्ट कार आणि मोबाईल असा एकूण १५ लाख ७९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे सापळा
केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या आठवड्यात अंमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.
या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी आपल्या पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल मनोज राठोड यांना गोपनीय माहिती मिळाली की, कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलापूर ते मिरज महामार्गावर इंचगाव टोलनाक्याजवळून एक व्यक्ती स्विफ्ट कारमधून मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन जाणार आहे.
ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना दिली. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जगताप यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित मार्गावर सापळा रचला.
कार थांबवून झडती घेतली अन् गांजा आढळला
पोलिसांनी कामतीकडून बेगमपूरच्या दिशेने येणाऱ्या संशयित स्विफ्ट कारवर लक्ष ठेवले. कार क्रमांक एमएच १० डी क्यू ८८९७ ही सापळ्याजवळ येताच पोलिसांनी सतर्कतेने कारवाई करत चालकाला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याने आपले नाव शुभम लालासाहेब काळे (वय २८), मूळ रा. हरगुळ रेल्वेजवळ, बार्शी रोड, एमआयडीसी, लातूर; सध्या रा. आंबेडकर नगर, अरळी कॉर्नर, जत, ता. जत, जि. सांगली असे सांगितले.
कारमधील पोत्याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी पोत्याची तपासणी केली. त्यामध्ये उग्र वास असलेला, हिरव्या रंगाचा, पाने, बिया आणि बोंडे असलेला गांजा आढळून आला.
गांजाची किंमत ८ लाख ९९ हजार ७०० रुपये
पोलिसांनी केलेल्या कारवाईत १७ किलो ९९४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत ८ लाख ९९ हजार ७०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट कार आणि मोबाईलही जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १५ लाख ७९ हजार ७०० रुपये आहे.
कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी कामती पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०२/२०२६ नुसार अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ मधील कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शुभम काळे याला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
आरोपीने हा गांजा नेमका कुठून आणला, तो कोणाला विक्री करण्यासाठी किंवा कुठे पोहोचविण्यासाठी घेऊन जात होता, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या कारवाईमागील संपूर्ण साखळी उघड करण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस हवालदार दशरथ गोरे, अविनाश पाटील, रवी माने, अतुल घाडगे तसेच पोलीस कॉन्स्टेबल अन्वर अत्तार, मनोज राठोड यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधातील मोहिमेला बळ मिळाले असून, गांजाचा पुरवठा करणाऱ्या पुढील साखळीचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.




