महादेव वाघमारे यांच्या प्रामाणिकतेचा DYSP गणेश शिंदे यांच्या हस्ते शाल-पुष्पगुच्छ देऊन सन्मान
धावपळीच्या आणि धकाधकीच्या जगात प्रामाणिकपणा अद्याप जिवंत असल्याचे उदाहरण आज मंद्रुप येथे घडले. विंचूर येथून उपचारासाठी मंद्रुपला आलेल्या एका दांपत्याचे हरवलेले सव्वा तोळे सोन्याचे दागिने एका पानटपरी चालकाच्या तत्परता व प्रामाणिकपणामुळे या दाम्पत्याच्या स्वाधीन करण्यात आले. डीवायएसपी गणेश शिंदे यांनी या प्रामाणिक टपरी चालकाचा सन्मान केला,
विंचूर येथील अंबिका साबळे व पांडुरंग साबळे पती-पत्नी मुलगा समर्थला घेऊन काल सकाळी मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आले होते. सेवालालनगर चौकातील बेकरी मध्ये खाऊ घेऊन ते विंचूरला जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला चौकात थांबले होते. त्यावेळी नकळत पत्नीच्या हातातील पाकीट खाली पडले. या पाकिटात तब्बल सव्वा तोळे सोन्याचे गंठण, मुलीच्या रिंगा, बुगड्या
मौल्यवान दागिने होते. तिकिटासाठी सुट्टे पैसे आहेत का? असे पतीने विचारल्यानंतर पत्नीने पाकीट मध्ये आहेत असे म्हटले. पण पिशवीत पाकीटच नव्हते. पाकीट हरवल्याचे दांपत्याच्या लक्षात आले, ज्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
लगेच मंद्रुप पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
पोलीस शिपाई माजीद शेख, दिव्य मराठीचे पत्रकार अमोगसिध्द लांडगे यांनी दांपत्यासह सीसीटीव्हीची पाहणी केली, मात्र ते मिळून आले नाही.
विंचूरला गावी जाण्यासाठी ज्या बाजूला हे पतीपत्नी थांबले होते. तेथील एका पानटपरी जवळ हे पाकीट पडले होते. चौकात पान टपरी चालवणारे महादेव वाघमारे यांना झाडू मारताना हे पडलेले पाकीट सापडले. पाकिटात मौल्यवान सोन्याचे दागिने असल्याचे दिसताच, त्यांनी दिव्य मराठीचे पत्रकार अमोगसिध्द लांडगे यांना पाकीट सापडले आहे. ते ज्यांचे कोणाचे असेल ते त्यांना परत करूया. लांडगे यांनी विंचूरचे साबळे कुटुंबाचे हे दागिने असल्याची खात्री केली. त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधून ही माहिती दिली.
याची दखल घेत आज मंद्रुपचे डीवायएसपी गणेश शिंदे यांनी प्रामाणिक पान टपरी चालक महादेव वाघमारे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. वाघमारे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकतेबद्दल कौतुक केले. तसेच दांपत्याचे हरवलेले सोने त्यांना सन्मानाने परत करण्यात आले. यावेळी पीएसआय राज डांगे, पत्रकार अमोगसिध्द लांडगे उपस्थित होते. आपले हरवलेले दागिने सुखरूप परत मिळाल्याचे पाहून या दांपत्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी महादेव वाघमारे आणि पोलिसांचे मनापासून आभार मानले. सध्या मंद्रुप परिसरात महादेव वाघमारे यांच्या या आदर्श आणि प्रामाणिकपणाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे
प्रामाणिकपणाचे केले कौतुक
आजच्या काळातही महादेव वाघमारे यांच्या सारखी प्रामाणिक माणसे समाजात आहेत. त्यामुळेच माणसावरील विश्वास टिकून आहे. समाजातील प्रत्येक नागरिकांनी असेच प्रामाणिक कार्य करावे, असे आवाहन करताना डीवायएसपी गणेश शिंदे यांनी वाघमारे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.



