कंदलगावच्या शासकीय जागांवरील अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

 

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील मौजे कंदलगाव येथील स्मशानभूमीच्या जागेची महसूल दप्तरी नोंद, हद्द निश्चिती तसेच शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत ग्रामस्थांनी माझ्याकडे प्रश्न मांडला होता. या पार्श्वभूमीवर आज संबंधित ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन संपूर्ण विषयाची सविस्तर माहिती घेतली.

कंदलगाव येथील गट नं. १८३, २६१/६२ व ३१० या जागांची ग्रामपंचायत अभिलेखात नोंद असतानाही महसूल अभिलेखातील आवश्यक नोंदींबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित जागांची तातडीने प्रत्यक्ष मोजणी करून हद्द निश्चित करावी, महसूल अभिलेख अद्ययावत करावेत आणि स्मशानभूमीसाठी असलेल्या सार्वजनिक जागेचे संरक्षण करावे, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच कंदलगाव परिसरातील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणाच्या तक्रारीचीही गंभीर दखल घेण्यात आली. संबंधित जमिनीची प्रत्यक्ष पाहणी व मोजणी करून वस्तुस्थिती तपासावी आणि अतिक्रमण आढळल्यास नियमानुसार तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. स्मशानभूमीची सार्वजनिक जागा असो किंवा शासनाची गायरान जमीन, शासकीय मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही.

यावेळी प्रांताधिकारी श्री. सुमित शिंदे, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार श्री. किरण जमदाडे, मंद्रूपचे अपर तहसीलदार श्री. विष्णू बुटे, गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या सार्वजनिक जागांचे संरक्षण आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने वेळ न दवडता ठोस कार्यवाही करावी, अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडली.

 

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon