सोलापूर – नेहरू वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भेडसावत असलेल्या अस्वच्छता, निकृष्ट सुविधा व विविध मूलभूत समस्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्या येऊन विद्यार्थ्यांच्या गैरसोयी तात्काळ दूर करावे या आशयाचे निवेदन सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे उपस्थित होते. जिल्हा परिषद चे खैरादि यांना बोलावून तात्काळ कामे चालू करण्याचे आदेश देण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नेहरू वसतिगृह चालविले जाते. मात्र, सद्यस्थितीत या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अत्यंत गंभीर व त्रासदायक परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे.
वसतिगृहाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून नियमित स्वच्छता होत नसल्याचे दिसून येते. तसेच स्वच्छतागृहे व बाथरूम अत्यंत अस्वच्छ अवस्थेत आहेत. तुंबलेली शौचालये, दुर्गंधी, सांडपाणी व घाणीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वसतिगृहातील दरवाजे, खिडक्या तसेच इतर भौतिक सुविधांचीही दुरवस्था झालेली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

विशेष म्हणजे, वसतिगृहाच्या स्वच्छतेसाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली असतानाही प्रत्यक्षात नियमित व प्रभावी स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी आहेत. यासाठी जिल्हा परिषदेकडून निधी खर्च होत असताना विद्यार्थ्यांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसेल, तर या संपूर्ण व्यवस्थेची चौकशी होणे आवश्यक आहे. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नेहरू वसतिगृहाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल घ्यावा. वसतिगृहातील सर्व शौचालये व बाथरूमची तातडीने स्वच्छता करून तुंबलेल्या व्यवस्था दुरुस्त कराव्यात.
वसतिगृह परिसरातील साचलेला कचरा तातडीने हटवून दररोज नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी.
स्वच्छतेसाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी.

तुटलेले दरवाजे, खिडक्या, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था व इतर आवश्यक बाबींची तातडीने दुरुस्ती करावी. विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून द्यावे.
वसतिगृहात नियमितपणे आरोग्य तपासणी व स्वच्छता निरीक्षण करण्याची व्यवस्था करावी.
विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी स्वतंत्र तक्रार नोंदवही/व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
वसतिगृहाच्या देखभाल व स्वच्छतेसाठी मंजूर होणारा निधी योग्य पद्धतीने खर्च होतो की नाही, याची प्रशासकीय चौकशी करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी व आरोग्याशी संबंधित सर्व समस्या तातडीने निकाली काढाव्यात. गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी असलेले हे वसतिगृह त्यांच्यासाठी आधारस्थान आहे. त्यामुळे त्यांना अस्वच्छ व असुरक्षित वातावरणात राहण्याची वेळ येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व भवितव्याचा विचार करून वरील सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले दक्षिण तालुका अध्यक्ष जैनुदिन नदाफ जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा कोळी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे कृष्णा पवार सचिन मोरे युवराज माने आदी उपस्थित होते.




