सलगर वस्ती पोलीस ठाण्यात रक्षाबंधन उत्साहात साजरे; महिला सदस्यांना वृक्षारोपणाचा संदेश देत रोपांची भेट
सोलापूर, दि. ३१ : अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि रक्षणासाठी तत्पर असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘एकता महिला मंच’च्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणारा विशेष व स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. सलगर वस्ती पोलीस ठाणे, सोलापूर येथे पोलीस बांधवांसह महिला पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साहपूर्ण आणि स्नेहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या वेळी सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल्य गजा, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वरांजली खामकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ‘एकता महिला मंच’च्या प्रमुख पदाधिकारी व महिला सदस्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या कार्याप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली.
विशेष म्हणजे, राखी बांधल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने उपस्थित महिला भगिनींना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देत उपस्थित प्रत्येक महिलेला भेट म्हणून एक रोप देण्यात आले. त्यामुळे रक्षाबंधनाच्या या उपक्रमाला सामाजिक आणि पर्यावरणपूरक स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमादरम्यान ‘एकता महिला मंच’चे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांनी या उपक्रमामागील भूमिका व सामाजिक बांधिलकीविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच मंचच्या सोलापूर जिल्हा प्रवक्त्या रंजना गवळी यांनी ‘एकता महिला मंच’च्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक श्रीशैल्य गजा यांनी ‘एकता महिला मंच’च्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “तुम्ही प्रथमच या पोलीस स्टेशनला आलात आणि आम्हा पोलीस अधिकारी व बांधवांना राखी बांधली. दैनंदिन कामाच्या व्यस्ततेमुळे अनेक वेळा रक्षाबंधनाच्या दिवशी आम्हाला गावी जाणे शक्य होत नाही. मात्र, आज तुम्ही स्वतः पोलीस ठाण्यात येऊन आम्हाला राखी बांधल्याने मनापासून आनंद झाला. ‘एकता महिला मंच’च्या या उपक्रमाचे मी मनःपूर्वक कौतुक करतो. पुढील वाटचालीस शुभेच्छा.”
सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वरांजली खामकर यांनीही महिला सदस्यांचे आभार मानत ‘एकता महिला मंच’च्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. “तुम्ही पोलीस ठाण्यात येऊन आम्हा सर्व पोलीस बांधवांना आणि महिला कर्मचाऱ्यांना राखी बांधली. त्यामुळे आमचा आजचा दिवस अत्यंत आनंदमय झाला आहे. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते,” असे त्या म्हणाल्या.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वरांजली खामकर यांनी वाढत्या सोशल मीडिया व सायबर गुन्ह्यांबाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी, अनोळखी व्यक्तींवर विश्वास न ठेवणे तसेच सायबर फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास पोलीस कॉन्स्टेबल दिलीप विधाते, सागर सुरवसे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
‘एकता महिला मंच’चे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर, सोलापूर जिल्हा प्रमुख लक्ष्मी सुतार, सोलापूर जिल्हा प्रवक्त्या रंजना गवळी यांच्यासह एकता महिला मंच, डोणगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील पदाधिकारी व सदस्यांमध्ये सावित्री पाटील, प्रीती येरनाळे, संजीवनी शेळके, रेखा शेळके, कविता देशेट्टी, सुवर्णा गायकवाड, राणी दगडे, सुरेखा शेळके, नीलगंगा येरनाळे, सोनाली येरनाळे, दुर्गा चौगुले, रंजना आसबे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच महिला सक्षमीकरण, सामाजिक सलोखा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ‘एकता महिला मंच’चा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.




