स्थानिक गुन्हे शाखेकडून कॉपर वायर चोरीच्या ११ गुन्ह्यांची उकल; ३ लाख ०४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

सोलापूर- सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाडसी कारवाई करत शेतातील इलेक्ट्रिक पंप, पानबुडी मोटर आणि केबल वायर चोरी करणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत कॉपर वायर चोरीच्या तब्बल ११ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, २३५ किलोग्रॅम वजनाची कॉपर वायर (किंमत ₹३,०४,२००) जप्त करण्यात आली आहे.
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये शेतीउपयोगी साहित्य आणि कॉपर वायर चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक मोहोळ पोलीस ठाणे हद्दीतील सय्यद वरवडे गावात तपासासाठी तैनात होते.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद वरवडे येथील रेकॉर्डवरील संशयित इसम त्याच्या राहत्या घराजवळील पडक्या खोलीत बसलेला आढळला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव रवींद्र उर्फ रवि, उर्फ गोट्या चंद्रकांत पवार (वय २५ वर्षे, रा. सय्यद वरवडे, ता. मोहोळ) असे असल्याचे सांगून चोरीची कबुली दिली.
आरोपी रवींद्र पवार याने त्याचा साथीदार पप्पू शिंदे (रा. तामदर्डी, ता. मंगळवेढा) याच्या मदतीने मागील ६ महिन्यांपासून मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये रात्रीच्या वेळी शेतातील व नदीपात्रातील पानबुडी मोटारी, केबल वायर चोरल्याचे सांगितले. चोरलेल्या केबल वायर्स शेतातील रानामध्ये जाळून, त्यातील तांब्याची तार पोत्यांमध्ये भरून विकली जात असे. आरोपीच्या घरातील पडक्या खोलीतून विक्रीसाठी ठेवलेली तब्बल १३ पोती तांब्याची तार पोलिसांनी जप्त केली आहे.
या कारवाईमुळे मोहोळ पोलीस ठाण्यातील ७, सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातील १, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील २ आणि पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील १ असे एकूण ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीवर बीएनएस ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वात सपोनि ज्ञानदेव वाघ, पोउनि ख्वाजा मुजावर, सफौ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, पोहकॉ नागेश कोणदे, मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार दिनेश पवार, कोंडिबा मोरे, अक्षय डोंगरे, सतीश बुरकुल आणि महिला पोलीस अंमलदार अश्विनी गोटे यांच्या पथकाने पार पाडली.

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon