मंद्रूप (सोलापूर): दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरघोट परिसरात अनधिकृत आणि बेकायदेशीरपणे हाडांचे कारखाने सुरू असल्याचे समोर येत आहे , कुरघोट या गावात प्राण्यांच्या हाडापासून भुकटी , आणि सडलेल्या मांसावर प्रक्रिया केली जात असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे दिवसेंदिवस स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

*गोवंश हत्या बंदीचा संशय..?*
या कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोवंशाच्या हाडांचा साठा आढळल्याने तेथील स्थानिक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी या कारखान्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मंद्रूप पोलिसांकडे काही महिन्यापूर्वी केली होती मात्र अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही..
मृत जनावरांच्या हाडापासून तेल आणि पावडर बनवण्याचा कारखाना कुरघोट परिसरात अनेक दिवसापासून सुरू आहे, प्रशासनाने या किळसवाण्या आणि असह्य दुर्गंधी पसरवणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून ते कायम स्वरूपात सील करणे गरजेचे असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..

सोलापूर- कुरघोट परिसरात जनावरांच्या हाडांचा आणि चरबीचा वापर करून बनावट डालडा आणि तूप बनत असल्याचा स्थानिकांचा संशय..
हाडांच्या कारखान्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या..
*पर्यावरण आणि आरोग्य*
कारखान्यातून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे जमिनीतील पाणी प्रदूषित होत आहे आणि हवेत पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे परिसरात श्वसनाचे आजार वाढत आहेत..
*कायदेशीर उल्लंघन*
अनेक कारखाने प्रदूषण नियंत्रण मंडळाची किंवा स्थानिक प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता छुप्या पद्धतीने चालवले जात असल्याची माहिती..
*कत्तलखाना की हाडांचा कारखाना नागरिकांमध्ये संभ्रम*
या कारखान्यांमध्ये, मोठ्या प्रमाणात गोवंशाच्या हाडांचा साठा आणि शिंग मोठ्या प्रमाणात आढळल्याने नागरिकांना गोहत्याच संशय येत आहे, स्थानिक शेतकरी आणि नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधूनही मंद्रूप पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कुरघोट परिसरातील या कारखान्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांचे जगणे असह्य झाले आहे.वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही.

या बेकायदेशीर व्यवसायाबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी मंद्रूप पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.आमदारांच्या या स्पष्ट सूचनेलाही मंद्रूप पोलिसांनी केराची टोपली दाखवली आहे.पोलिसांच्या या ढिसाळ आणि दुर्लक्षित भूमिकेमुळे ‘खाकी’च्या कार्यपद्धतीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आमदारांच्या आदेशानंतरही पोलीस ढिम्म राहिल्याने, या अवैद्य कारखाना चालवणाऱ्यांना पोलिसांचेच छुपे अभय आहे का.? अशी शंका आता नागरिक उपस्थित करत आहेत. याप्रकरणी वरिष्ठांनी तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.




