जातीवाचक शिवीगाळ प्रकरणात दोघा भावांची निर्दोष मुक्तता, आरोप सिद्ध करण्यात सरकार पक्ष अपयशी,

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

बार्शी न्यायालयाचा निर्णय

जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या खटल्यात सासुरे (ता. बार्शी) येथील गुलाब जालिंदर आवारे (वय ३८) आणि बालाजी जालिंदर आवारे (वय ४२) या दोघा भावांची बार्शी येथील जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जिल्हा न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणातील फिर्यादी तानाजी भागवत धडे (वय ४७, रा. सासुरे) हे २० फेब्रुवारी २०२० रोजी घरातील पाण्याच्या नळाला कमी पाणी येत असल्याची तक्रार घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. ते ग्रामसेवकांना याबाबत माहिती देत असताना गुलाब आवारे हे मोबाईलमध्ये शूटिंग करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावरून धडे यांनी शूटिंग करू नका, असे सांगितले. यानंतर दोन्ही भावांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप धडे यांनी केला.

दरम्यान, दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू असताना तानाजी धडे यांच्या पत्नी तेथे आल्या. त्यांनाही आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता. याप्रकरणी धडे यांनी वैराग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी तपास करून दोन्ही आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

सहा साक्षीदारांची साक्ष; मात्र आरोप सिद्ध करण्यात अपयश

खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, बचाव पक्षाने साक्षीदारांच्या उलटतपासणीत फिर्यादी आणि आरोपी यांच्यात यापूर्वीपासून वाद असल्याची बाब समोर आणली. तसेच, आरोपातील आवश्यक घटक सरकार पक्षाला ठोस पुराव्यांद्वारे सिद्ध करता आले नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.

बचाव पक्षाचे अॅड. मिलिंद थोबाडे आणि अॅड. निखिल पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे अपुरे असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने गुलाब आवारे आणि बालाजी आवारे या दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

या खटल्यात आरोपींतर्फे अॅड. मिलिंद थोबाडे व अॅड. निखिल पाटील यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे अॅड. डी. डी. देशमुख यांनी बाजू मांडली.

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon