सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीची प्रक्रिया आता वेगाने पुढे सरकत असून, या निवडणुकीत जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील जुने-नवे राजकीय संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या मतदार यादीची प्रक्रिया सुरू असून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख आणि माजी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 2025 च्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत या दोन्ही देशमुखांनी एकत्र येत स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. त्यांच्यासमोर आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्या पॅनेलने आव्हान दिले होते. अखेर कल्याणशेट्टी-माने-हसापुरे गटाने 18 पैकी 13 जागा जिंकत बाजार समितीवर वर्चस्व मिळवले.
त्यामुळे बाजार समितीनंतर आता DCC बँकेच्या निवडणुकीतही देशमुख विरुद्ध सत्ताधारी भाजपमधील प्रमुख नेते असा सामना रंगतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पालकमंत्री गोरेंची भूमिका महत्त्वाची
DCC बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका सध्या विशेष चर्चेत आहे. ऑगस्टमध्ये बोलताना गोरे यांनी बँकेतील गैरव्यवहाराच्या चौकशीचा संदर्भ देत दोषींवर कारवाई होईल आणि दोषी व्यक्तींना सोबत घेऊन निवडणूक लढवली जाणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. बँकेच्या हिताच्या विरोधात असलेल्या उमेदवारांनाही सोबत घेतले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
यामुळे आगामी निवडणुकीत केवळ पक्षीय राजकारण नव्हे, तर ‘बँकेच्या कारभाराचा मुद्दा’ आणि ‘सहकार क्षेत्रातील नेतृत्व’ हेही प्रमुख मुद्दे ठरण्याची शक्यता आहे.
मोहिते पाटील विरुद्ध गोरे संघर्षाचीही पार्श्वभूमी
DCC बँकेची निवडणूक सोलापूरच्या व्यापक राजकारणात महत्त्वाची मानली जात आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील भाजप गट आणि मोहिते पाटील गट यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यानंतर DCC बँकेच्या निवडणुकीतही दोन्ही गटांमध्ये पुन्हा सामना होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या समीकरणात आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार राजेंद्र राऊत यांची भूमिकाही महत्त्वाची ठरू शकते.
विधान परिषद निवडणुकीनंतर राजेंद्र राऊत यांनी DCC बँकेशी संबंधित काही कर्जवसुलीच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे बँकेची निवडणूक ही आगामी काळातील जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरण्याची चिन्हे आहेत.




