तडवळ जिल्हा परिषद शाळेतील मूलभूत सुविधांचा बोजवारा जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील जिल्हा परिषद शाळेतील मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ५० वर्षांहून अधिक जुनी झालेल्या शाळेच्या इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. त्यातच स्वच्छतागृहांची दुरवस्था, नादुरुस्त पाणीपुरवठा, सहा महिन्यांपासून बंद असलेली सीसीटीव्ही यंत्रणा आणि किचन शेडमध्ये उंदीर-घुशींचा वाढलेला वावर यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

तडवळ शाळेत मराठी, कन्नड आणि उर्दू माध्यमांचे वर्ग भरतात. मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधाच उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. शाळेच्या जुन्या इमारतीच्या भिंतींना तडे गेल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची चिंता अधिक वाढली आहे. त्यामुळे इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक भागाची पाहणी करण्याची मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे.

विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या किचन शेडची अवस्था विशेष चिंताजनक आहे. शेडमध्ये उंदीर आणि घुशींचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. अन्न शिजविले जाणाऱ्या ठिकाणी स्वच्छता आणि कीटकनियंत्रणाच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. किचन शेडमधील उंदरांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत मुख्याध्यापक गौतम कांबळे यांनी माध्यम प्रतिनिधीलाच विचारल्याने त्यांच्या भूमिकेवरही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पोषण आहाराच्या ठिकाणी नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि कीटकनियंत्रणाची व्यवस्था करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

शाळेतील स्वच्छतागृहांची अवस्थाही दयनीय आहे. स्वच्छतागृहांची दारे बंद असून पाणीपुरवठ्याची टाकी नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप आहे. मुला-मुलींना स्वच्छतागृहासाठी बाहेर जावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेसह स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणाही गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्याचे सांगण्यात येते. शाळेच्या आवारात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सीसीटीव्ही सुरू असणे आवश्यक असताना त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळेच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाकडे वारंवार निधीची मागणी करण्यात आल्याचा दावा सरपंच संतोष कुंभार, उपसरपंच शंकर ग्वाडयाळ आणि पालक सुभाष बरूरे यांनी केला आहे. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबळे यांनी नुकतीच शाळेला भेट दिली. मात्र, या भेटीत शाळेतील धोकादायक इमारत, स्वच्छतागृह, पाणीपुरवठा, सीसीटीव्ही आणि किचन शेडमधील समस्यांकडे पुरेसे लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या सर्व बाबींची स्वतंत्र चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही होत आहे.विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण देण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना, दुर्घटना घडण्याची वाट पाहायची का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

नवीन इमारतीचा निर्णय तातडीने घ्या

जुनी इमारत पाडून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व सर्व सुविधांनीयुक्त नवीन इमारत उभारावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शाळेतील प्रत्येक समस्येकडे स्वतंत्रपणे न पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीची संयुक्त पाहणी करणे गरजेचे आहे. स्ट्रक्चरल ऑडिट, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, पाणीपुरवठा सुरळीत करणे, सीसीटीव्ही सुरू करणे आणि किचन शेडमधील उंदरांचा बंदोबस्त या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon