बार्शी तालुक्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत आगळगाव येथे फळझाडांच्या आड लपवून केलेली गांजाची लागवड उघडकीस आणली. घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत आंबा, लिंबू व पपईच्या झाडांमध्ये गांजाची झाडे लावल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले.
गोपनीय माहितीवरून कारवाई
दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने आगळगाव येथे कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमंत भिमराव गरड (वय ७६, रा. आगळगाव) यांच्या घराच्या पाठीमागे किचन रूमलगतच्या जागेची पाहणी केली असता फळझाडांमध्ये लपवून गांजाची लागवड केल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान एकूण १० किलो १२२ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, त्याची अंदाजे बाजारपेठेतील किंमत २ लाख ५३ हजार ५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) व २२(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत अक्षय सोनवणे, आबासाहेब शिरगिरे, युवराज गायकवाड, अमृता गुंड, सिद्धेश्वर लोंढे, ओमप्रकाश दासरे, जिदास काकडे आणि शिवशंकर खराडे यांनी सहभाग घेतला.
फळझाडांच्या आड गांजाची लागवड; पोलिसांची नजर चुकवण्याचा प्रयत्न?

आंबा, लिंबू आणि पपईच्या झाडांमध्ये गांजाची लागवड करून ती पोलिसांच्या नजरेपासून लपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे या कारवाईत समोर आले आहे. नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अमली पदार्थांविरोधात कारवाईला वेग आला असून, अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




