अकलूज पोलिसांची मोठी कारवाई – अवैध शस्त्रसाठा जप्त- 6 जण अटक

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

अवैध अग्निशस्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीवर अकलुज पोलिसांनी धडक कारवाई करत १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली असून २ जण फरार आहेत.

पोहेकॉ श्रीराम पोरे यांना १४ ऑगस्ट रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, विकास कैलास वजाळे रा. परीते, ता. माढा हा टाटा नेक्सॉन कार MH 45 AE 7002 मधून अकलुज-टेंभुर्णी रोडवरील पतंगे मटन हॉटेलजवळ देशी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी येणार होता. पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या पथकाने सापळा लावून विकास वजाळेला २ पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे परवाना नसल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम ३, ५, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)(३), १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या चौकशीत वजाळेने ही शस्त्रे राहुल सतिश माने रा. मिरज याच्याकडून घेतल्याचे सांगितले. तसेच त्याने मध्यप्रदेशातील बडवाणी येथील अनिल पंचलाल मेहता याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणून सोलापूर, सांगली, बेळगाव भागात विक्री केल्याची कबुली दिली.

वजाळेने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी महादेव कोरके रा. करकंब, विजय किरणगी रा. बेळगाव, सुमित लवटे रा. सांगोला, शनि बनसोडे रा. अकोले आणि प्रदिप माने रा. चिकमहुद यांच्याकडून प्रत्येकी १ पिस्टल व २ काडतुसे जप्त केली.

तपास वाढवत असताना १५ ऑगस्ट रोजी सोनगीर, जि. धुळे येथे अनिल मेहता ४ पिस्टल व २५ काडतुसांसह ताब्यात आला. त्याच्याच मदतीने मिरजचा फरार आरोपी राहुल माने यालाही टेंभुर्णी येथून अटक करण्यात आली. माने याच्याकडून ६ पिस्टल व ८ काडतुसे जप्त झाली आहेत. माने हा यापूर्वी उमदी पोलीस ठाण्यातील शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यात फरार होता.

एकूण कारवाईत १७ देशी पिस्टल किंमत १० लाख, ४७ काडतुसे ४७ हजार आणि ८ लाखांची नेक्सॉन कार असा १८ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त झाला आहे. अटक केलेल्या ६ आरोपींना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रदिप माने व शनि बनसोडे फरार आहेत. पुढील तपास सपोनि विक्रम साळुंखे करत आहेत. जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरुद्ध मोहीम सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon