बार्शी : शेलगाव (मा.) येथे धाराशिवकडे जाणाऱ्या रस्त्यालगत चिंचेच्या झाडाखाली सुरू असलेल्या ‘मन्ना’ नावाच्या जुगार अड्ड्यावर बार्शी तालुका पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सात जणांना पकडून त्यांच्याकडील रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि मोटारसायकली असा एकूण ३ लाख ५७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दि. १६ ऑगस्ट रोजी काही जण जुगार खेळत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी सात जण जुगार खेळताना आढळून आले.
या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६०/२०२६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत अमोल उर्फ बालाजी बब्रुवान काळे (३२), सुनील माणिक मारकड (३६), रमेश सिद्धाराम खांडेकर (६०), नंदकुमार उत्तम माळी (३८), काका उर्फ लक्ष्मीकांत व्यंकटेश मारकड (४४), आकाराम गंगाधर शिंदे (५५) आणि दिलीप उर्फ रमेश वैजिनाथ काळे (३९), सर्व रा. शेलगाव (मा.), यांच्यावर कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे यांच्यासह अमृत खेडकर, प्रदीप चौधरी, सागर वाकळे, शिवशंकर खराडे, कावळे आणि अमृता गुंड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अवैध धंद्यांविरोधात बार्शी तालुका पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे जुगार चालकांचे धाबे दणाणले आहेत.




