*सात वर्षांच्या ‘गंगा’ला मुलीप्रमाणे जपलं; पाटील परिवाराने नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा केला कार्यक्रम*
गायीचा वाढदिवस किंवा डोहाळे जेवण साजरे करण्याच्या घटना यापूर्वी महाराष्ट्रात पाहायला मिळाल्या आहेत; मात्र सोलापुरातील केगावमध्ये गायीची ओटी भरून तिच्यासाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केल्याची अनोखी घटना सोलापुरातील केगाव येथे पाहायला मिळाली आहे. तम्मा पाटील आणि अप्पू पाटील यांच्या परिवाराने आपल्या लाडक्या ‘गंगा’ या गाईचा ओटी भरण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. या अनोख्या उपक्रमाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

पाटील परिवार गेल्या सात वर्षांपासून ‘गंगा’चे लहानपणापासून संगोपन करत आहे. गंगा ही केवळ गोठ्यातील गाय नसून परिवारातील एका मुलीप्रमाणेच तिची काळजी घेतली जाते.

गंगेला मुलीप्रमाणे जपणाऱ्या पाटील परिवाराची अनेक दिवसांपासून तिच्यासाठी एक आगळावेगळा कार्यक्रम करण्याची इच्छा होती. त्यातूनच गायीची ओटी भरण्याचा आणि पाहुण्यांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार नातेवाईक, मित्रमंडळी तसेच गावातील नागरिकांना निमंत्रित करून हा सोहळा उत्साहात पार पडला.

सामान्यतः ‘ओटी भरणे’ हा महाराष्ट्रातील पारंपरिक विधी असून त्याला मातृत्व, सुफलन आणि मंगल आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. मात्र पाटील परिवाराने आपल्या गाईला कुटुंबातील सदस्य मानत तिच्यासाठी हा सोहळा आयोजित केल्याने या कार्यक्रमाला विशेष भावनिक आणि आगळेवेगळे स्वरूप प्राप्त झाले.
पाटील परिवाराच्या या उपक्रमामागे केवळ धार्मिक किंवा पारंपरिक भावना नसून प्राण्यांप्रती असलेले प्रेम आणि जिव्हाळा असल्याचे दिसून येते. सात वर्षांपासून ज्या गाईला मुलीप्रमाणे जपले, तिच्यासाठी कुटुंबीयांनी मोठ्या आनंदाने हा कार्यक्रम आयोजित केला. गंगेला मुलीचा मान देत पाटील परिवाराने केलेला हा अनोखा सोहळा सध्या केगाव परिसरात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित सुमनकिर्ती परिवाराचे सर्वेसर्वा विजयकुमार कादे मालक तसेच तानाजी मलपे, ठाबरे मालक, डोगरे मालक, शेखर ढोबळे, गणेश कोरे, रामेश्वर अबारे, अमर बसवती, सोमा गुदगे, अमोल जाधव तसेच रुपा गुदगे, सुजाता जोकारे, सुनीता झुजे आणि शारदा राजूरे यांच्यासह नातेवाईक, महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




