आदिवासी गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप; वशेणी येथे सामाजिक बांधिलकीचा आदर्श

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

 

उरण दि. ११ (विठ्ठल ममताबादे) — प्राध्यापक जयदास पाटील शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, वशेणी येथील आदिवासी, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ‘स्व. संगीता मच्छिंद्रनाथ ठाकूर फाउंडेशन’च्या वतीने गणवेश वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावणाऱ्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
फाउंडेशनचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ मच्छिंद्र ठाकूर तसेच त्यांच्या अर्धांगिनी, माजी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस उरण विधानसभा अध्यक्ष कुंदा वैजनाथ ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस रायगड सरचिटणीस प्रवीण रामशेठ ठाकूर होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर ईशस्तवन व स्वागतगीताने वातावरण मंगलमय झाले.
यावेळी मच्छिंद्र ठाकूर (ओबीसी सेल अध्यक्ष), रामदेव मढवी, नित्यानंद घरत, रतन म्हात्रे, नामदेव मढवी, हिराचंद पाटील, कोणते पाटील तसेच जयदास पाटील शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, सचिव राकेश पाटील, सदस्य प्रदीप पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शांताराम पवार, कार्याध्यक्ष सुशांत म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शुभप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी बंधन म्हात्रे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते निवेश ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले.


कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वैजनाथ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्याची माहिती देत त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक दाखवून त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांशी प्रामाणिकपणे वागावे, शिक्षणाकडे गांभीर्याने पाहावे आणि आपल्या आई-वडिलांसह शाळेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी मेहनत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
“गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश उपलब्ध करून देणे ही केवळ मदत नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश पाटील सर यांनी केले, तर शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण पाटील सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी वैजनाथ ठाकूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना नाश्त्याचे वाटप करण्यात आले.
आदिवासी, गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उपस्थित ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात व उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon