१९ गुन्ह्यांपासून ‘१० टक्के’च्या आरोपांपर्यंत सुषमा अंधारे यांचा घणाघात मयत रुग्णाचे बोगस बिल तयार करून लाटले पैसे पोलिसांना हाताशी धरून गुन्ह्यातील नाव केले तुम्ही,
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर १९ हून अधिक गुन्हे दाखल असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला. “काय किर्ती राव, मिस्टर गोरे?” असा सवाल करत त्यांनी फसवणुकीसह महिलांशी संबंधित प्रकरणांवरून गोरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. या आरोपांची सखोल चौकशी करून गंभीर प्रकरणांमध्ये कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

“गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये नावे समोर आलेल्या व्यक्तींना भाजपमध्ये स्थान दिले जाते आणि दुसरीकडे मूळच्या भाजप कार्यकर्त्यांना बाजूला केले जाते,” असा आरोप अंधारे यांनी केला. “हे पालकमंत्री नाहीत, तर बालकमंत्री आहेत,” असा टोला लगावत त्यांनी जयकुमार गोरे यांची राजकीय आणि सामाजिक प्रतिमा कोणत्या कामामुळे निर्माण झाली, असा प्रश्न उपस्थित केला.
कोरोना काळामध्ये मयत रुग्णाचे जिवंत रुग्ण दाखवून बोगस बिले करून पैसे लाटण्याचा आरोप अंधारे यांनी केला. सुमारे 200 हून अधिक बोगस बिले या काळात तयार केले गेले. खोटा मेडिकल ऑफिसर दाखवून त्याच्या सहीनिशी हजारो बिले लाटली. या प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी देखील संगणमताने काम करत एफ आर आय आणि चार्जशीट मधील जयकुमार गोरे यांचे नाव काढून टाकले. वास्तविक पाहता यासंबंधी उच्च न्यायालयात धाव घेतली असता त्यांच्या विरोधात न्यायालयाने समन्स बजावण्यात आला आहे. भाजप मधील हा पहिला मंत्री असेल ज्यावर इतके खटले आणि गुन्हे दाखल झाले आहेत. अशा लोकांमुळे भाजपच्या मोर्चात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सुषमा अंधारे यांनी मुंग्यांच्या वारुळाचे उदाहरण देताना.. मुंग्या वारूळ बांधतात परंतु त्या वारुळामध्ये विषारी नाग राहतात… त्याप्रमाणे एकनिष्ठ आरएसएस आणि भाजप कार्यकर्त्यांनी बांधलेल्या सरकारमध्ये हे विषारी नाग राहत असल्याचे सांगितले.
यांसह भाजपचे महामंत्री विजय चौधरी आणि जयकुमार गोरे यांच्याशी संबंधित कथित ‘१० टक्के’ मागणीच्या प्रकरणाचाही अंधारे यांनी उल्लेख केला. या प्रकरणातील आरोपांची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.
महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या परिसीमनाच्या मुद्द्यावरही अंधारे यांनी सरकारवर निशाणा साधला. दक्षिणेकडील भागातील प्रतिनिधित्व कमी करून उत्तरेकडील भागात वाढ करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रक्रियेत पारदर्शकता आणि जनतेच्या हिताचा विचार झाला पाहिजे, अशी भूमिका मांडली.
आंदोलनांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिसादावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना सन्मानाने आणि सकारात्मक पद्धतीने उत्तर देण्याऐवजी सरकारकडून दडपशाहीची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यातील सत्तासंघर्षावर भाष्य करताना अंधारे यांनी सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत मतभेदांवरही टीका केली. खातेवाटपावरून सत्ताधारी पक्षांमध्ये सुरू असलेल्या कथित रस्सीखेचीचा उल्लेख करत त्यांनी भाजप आणि मित्रपक्षांमधील सत्तासमीकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काही नेते पुढील राजकीय घडामोडींसाठी ‘बाशिंग बांधून तयार’ असल्याचा टोला लगावत, अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यांवरून सत्ताधारी गटांमध्ये मतभेद असल्याचेही त्यांनी म्हटले.
एकूणच, जयकुमार गोरे यांच्यावरील कथित गुन्हे, ‘१० टक्के’ मागणीचे आरोप, महिला आरक्षण व परिसीमनाचा मुद्दा आणि महायुतीतील खातेवाटपावरून सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार राजकीय हल्लाबोल केला. त्यांच्या या आक्रमक आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, आता संबंधितांकडून या आरोपांना काय उत्तर दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.




