पर्यावरण पूरक व सामाजिक उपक्रमातून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या 12 मंडळांचा ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरव….
सोलापूर ग्रामीण पोलिसांचा स्तुत्य उपक्रम; पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तिपत्र देऊन गौरव
सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सन २०२६ चा गणेशोत्सव उत्साह, आनंद आणि शांततामय वातावरणात पार पडला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी जिल्हास्तरीय शांतता समिती तसेच गणेश मंडळांच्या बैठका घेऊन ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी “No DJ, No Dolby, No Laser Light” या संकल्पनेचा स्वीकार करण्याचे आवाहन केले होते.
यासोबतच पारंपरिक मिरवणुकांऐवजी गणेश मंडळांनी समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले होते. या आवाहनाला जिल्ह्यातील गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

विविध गणेश मंडळांनी रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, जनजागृतीपर कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अशा विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन केले. त्यामुळे गणेशोत्सवाला केवळ धार्मिक उत्सव न ठेवता सामाजिक बांधिलकीची जोड देण्याचा सकारात्मक प्रयत्न करण्यात आला.
प्रत्येक उपविभागातून एका मंडळाची निवड
गणेशोत्सव काळात राबविण्यात आलेल्या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचा सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून आढावा घेण्यात आला. त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रत्येक उपविभागातील एका गणेश मंडळाची निवड करण्यात आली. अशा एकूण १२ गणेश मंडळांचा गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील संवाद हॉलमध्ये विशेष सन्मान करण्यात आला.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते संबंधित मंडळांच्या अध्यक्षांना ट्रॉफी व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
सन्मानित गणेश मंडळे
१. आदर्श गणेश उत्सव मंडळ, मोहोळ — अध्यक्ष संकेत गणेश मुंडासे.
२. शिवप्रेमी तरुण मंडळ, बी. बी. दारफळ — अध्यक्ष महेश दत्तात्रेय साठे.
३. लोकमान्य गणेश मंडळ, अक्कलकोट — अध्यक्ष मिलन मल्लप्पा कल्याणशेट्टी.
४. श्री जगदंबा गणेश उत्सव सांस्कृतिक व सामाजिक क्रीडा मंडळ, कसबा पेठ, माढा — अध्यक्ष महेश नारायण भांगे.
५. आझाद गणेश मंडळ, बार्शी — अध्यक्ष सुरज बाळासाहेब बरीदे.
६. कोष्टी गल्ली गणेश मित्र मंडळ, टेंभुर्णी — अध्यक्ष वैभव शशिकांत वाघावकर.
७. शनिराज गणेश मित्र मंडळ, कुडुवाडी — अध्यक्ष प्रतीक सोमनाथ शेंबडे.
८. लोकप्रिय भैय्यू देशीय गणेश तरुण मंडळ, महिम, ता. सांगोला — अध्यक्ष गणेश दत्तात्रेय गोरवे.
९. जय भवानी गणेश उत्सव मंडळ, नंदेश्वर, ता. मंगळवेढा — अध्यक्ष वीराज बिरा रूपनर.
१०. वक्रतुंड गणेश उत्सव तरुण मंडळ, ईसबावी, पंढरपूर — अध्यक्ष नितीन काशिनाथ लाड.
११. आझाद तरुण मंडळ, आझादचा राजा, नातेपुते — अध्यक्ष सिद्धार्थ सतीश जमदाडे.
१२. छावा ग्रुप गणेश मंडळ, नेवरे, ता. माळशिरस — अध्यक्ष शेखर अशोक बोबडे.
ध्वनिप्रदूषण टाळण्याचे पोलिसांचे आवाहन
या वेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे तसेच अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी सन्मानित गणेश मंडळांचे अभिनंदन केले. भविष्यातही गणेश मंडळांनी ध्वनिप्रदूषण टाळून, पर्यावरणाचे संरक्षण करत तसेच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना मदत, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीचे काम करणाऱ्या मंडळांचा सन्मान करून सोलापूर ग्रामीण पोलिसांनी इतर गणेश मंडळांसमोरही एक सकारात्मक आदर्श ठेवला आहे.
“उत्सवातून समाजसेवा आणि भक्तीतून पर्यावरण संवर्धन” हा संदेश या उपक्रमातून जिल्ह्यात पोहोचला असून, भविष्यात गणेशोत्सव अधिक सामाजिक, पर्यावरणपूरक आणि शांततामय पद्धतीने साजरा करण्यासाठी या उपक्रमाला निश्चितच प्रोत्साहन मिळणार आहे.




