दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आढीवच्या ज्येष्ठ शेतकऱ्याने केली 51,111/- रुपयांची आर्थिक मदत..
सोलापूर : आढीवचे शेतकरीपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. दिनकर दाजी चव्हाण यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत रु. ५१,१११/-रू चा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे कर्तव्यदक्ष नूतन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे सुपूर्द केला.

दुष्काळाच्या काळात शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी दिनकर दाजी चव्हाण यांनी यापूर्वीही अनेक वेळा राष्ट्रीयीकृत बँकेचा डी.डी. काढून मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यातून शेतकरी व दुष्काळग्रस्त बांधवांप्रती असलेली आस्था आणि सामाजिक बांधिलकी दिसून येते.

यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिनकर दाजी चव्हाण यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांच्या योगदानाबद्दल अभिनंदन केले.नारळ व्यापारी अशोक देवकर, आमदार अभिजीत आबा पाटील यांचे स्वीय सहाय्यक विक्रम दास तसेच सोमनाथ गोरे उपस्थित होते.

श्री.दिनकर दाजी चव्हाण यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी समाजातील इतरांनीही पुढे येऊन मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे…..




