स्थानिक गुन्हे शाखेकडून मोठी कामगिरी: २ दरोड्यांसह १९ घरफोड्यांत हव्या असलेल्या कुख्यात सराईत गुन्हेगारास अटक
सोलापूर – सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यात २ दरोडे आणि तब्बल १९ घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये हवा असलेल्या सराईत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यातील २ सोलर कॉपर वायर चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, आरोपीकडून ५७,६०० रुपये किमतीची ४८ किलो कॉपर वायर जप्त करण्यात आली आहे.
सचिन उर्फ सध्या अभिमन्यू उर्फ अभिमाणू काळे (वय ३२ वर्षे, रा. एकता नगर, सावळज रोड, जत, जि. सांगली; सध्या रा. वल्लभवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे.
सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळ येथील वैराग कडे जाणाऱ्या पुलाखाली एक संशयित इसम फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गस्तीदरम्यान गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने आपले नाव सचिन उर्फ सध्या काळे असे सांगून, त्याचा साथीदार बाबा छप्पऱ्या (रा. वल्लभवाडी, ता. मोहोळ) याच्या मदतीने मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
अटक आरोपी सचिन काळे याच्या गुन्हेगारी अभिलेखाची तपासणी केली असता, त्याच्यावर महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले:
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील उघड गुन्हे: मोहोळ पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ५८८/२०२६ व ४०५/२०२६ (सोलर वायर चोरीचे गुन्हे).
महाराष्ट्रातील इतर गुन्हे: मोहोळ, बार्शी तालुका, वैराग आणि कामती पोलीस ठाण्यांत दरोडा व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
तेलंगणा राज्यातील गुन्हे: तेलंगणातील महबूबनगर ग्रामीण व महबूबनगर शहर पोलीस ठाण्यांत तब्बल १२ हून अधिक घरफोडी व दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय राठोड, पोलीस हवालदार सलिम बागवान, हरीदास पांढरे, विरेश कमशेट्टी, नागेश कोपडे, व्यंकटेश मोरे, जगदीश राठोड, पोलीस अंमलदार दिनेश पवार, योगेश जाधव, कपिल काटकर, सुनिल पवार, अशोक हलसंगी, मपोकॉ/सुलभा झाळके, पल्लवी इंगळे-पाटील तसेच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गणेश वाळे यांच्या पथकाने पार पाडली.




