टेंभुर्णी शहरातील नाळेवस्ती परिसरात पार्किंगच्या कारणावरून झालेल्या वादाला हिंसक वळण लागून नागनाथ मच्छिंद्र जाधव (वय ४१, रा. वेणेगाव, ता. माढा) यांचा चाकूने भोकसून खून झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. सदर प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेंभुर्णी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता नाळेवस्ती येथील सद्दाम पटवारी यांच्या घरासमोरील पार्किंगच्या जागेत गाडी लावण्यावरून वाद सुरू होता. हा वाद सोडविण्यासाठी नागनाथ जाधव मध्ये गेले. यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर समाधान चौधरी व सागर कुटे यांनी धारदार चाकूने पाठीवर व मांडीवर वार करून जाधव यांचा खून केला.

दरम्यान, आरोपी यांनी सद्दाम पटवारी यांनाही हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच जाधव यांना चाकूने भोकसून व सद्दाम पटवारी यांना मारहाण करून आरोपी आय-२० कार आणि टाटा एंट्रा वाहनातून घटनास्थळावरून पसार झाले.
सदर प्रकरणात राज कदम, समाधान चौधरी, सागर कुटे, रणजीत पवार यांच्यासह आणखी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर खुनाच्या गुन्ह्याचा तपास अंजना कृष्णा, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तसेच सपोनि संदेश बावकर यांनी सदर गुन्हा दाखल केली.
“पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी काय भूमिका घेणार…?”
परिते येथे सार्वजनिक ठिकाणी बंदुकीतून हवेत गोळी झाडल्याची घटना ताजी असताना टेंभुर्णी मध्ये चाकूने भोकसून खून केल्याची नवी घटना घडल्याने टेंभुर्णी शहर व परिसरामध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.
तसेच टेंभुर्णी शहर व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंडागर्दी व दादागिरी वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना रस्त्याने फिरणे देखील मुश्किल झाले आहे.
टेंभुर्णी शहर व परिसरामधील वाढती गुंडगिरी व दादागिरी वरती आळा बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहेत.




