बळीराजाला आश्वासनांची नाही आधाराची गरज आहे – आदित्य ठाकरे
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांनी जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वरफळ येथे सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या..

निसर्गाच्या संकटाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले आहे. वर्षभराची मेहनत, बियाणे-खते-औषधांचा खर्च आणि लाखो रुपयांची गुंतवणूक डोळ्यांसमोर मातीमोल झाली आहे. शेतकरी आज मदतीच्या प्रतीक्षेत आहे, त्याला केवळ दुष्काळ जाहीर केल्याच्या घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष आर्थिक मदत त्याच्या खात्यात जमा झाली पाहिजे..

शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष करून घोषणा, पंचनामे आणि कागदी आदेशांच्या फेऱ्यात सरकारने वेळ घालवू नये. बळीराजाला तातडीने ठोस मदत मिळवून देण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत..

शेतकऱ्यांच्या हक्काच्या मदतीबाबत सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल. शेतकऱ्यांच्या जखमेवर फसव्या घोषणांचा मुलामा लावण्याचा प्रयत्न झाला, तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही. गरज पडल्यास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आदित्य ठाकरे त्यांनी दिला..




