स्वतःच्याच लुटीचा प्लॅन; फायनान्स कर्मचाऱ्याने मित्रांच्या मदतीने रचला बनाव
फायनान्स कंपनीच्या पैशांवर डल्ला मारण्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यानेच स्वतःच्या लुटीचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या लासूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. फायनान्स कंपनीचा कर्मचारी वसुलीसाठी बाहेर पडला… त्यानंतर काही जणांनी हल्ला करून आपले हात-पाय बांधले आणि रोख रक्कम घेऊन पसार झाल्याचा दावा त्याने केला. याबाबतचा एक व्हीडिओ सुद्धा व्हायरल झाला. मात्र, पोलिसांच्या तपासात या संपूर्ण लुटीच्या कटाचा पर्दाफाश झाला. स्वतःच्या मित्रांच्या मदतीने स्वतःलाच बांधून घेत कर्मचाऱ्याने लुटीचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. या गंगापूर पोलिसांनी कारवाई करत फायनान्स कर्मचाऱ्यासह त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे रोख रक्कम हडप करण्यासाठी रचलेला हा ‘स्वतःच्याच लुटीचा प्लॅन’ आता पोलिसांच्या कारवाईमुळे चांगलाच अंगलट आला आहे.




