मंद्रूप ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था राखणार; गणेश शिंदे

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

 

मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवून परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही मंद्रूपचे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश शिंदे यांनी दिली.

तत्कालीन पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांची सोलापूर पोलीस मुख्यालयात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी गणेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीनिमित्त दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या वतीने वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी व पत्रकार अमोगसिद्ध लांडगे यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना गणेश शिंदे म्हणाले की, यापूर्वी आपण गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात काम केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दुसऱ्यांदा उत्तीर्ण झाल्यानंतर सोलापूर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. या कार्यकाळात अवैध धंदे तसेच डान्सबारवर धडक कारवाई करण्यात आली आहे. आता मंद्रूप पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून, या हद्दीतील सर्व गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभावीपणे काम करण्यात येईल.

मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय चालू दिले जाणार नाहीत. अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच कायदा व सुव्यवस्था मोडणारे, महिला व मुलींची छेड काढणारे रोडरोमिओ यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटारी, केबल, दुचाकी-चारचाकी वाहने तसेच मोबाईल चोरीच्या घटना रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. सत्याच्या बाजूने असलेल्या गोरगरीब जनता, शेतकरी, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध राहील. सर्वांना सोबत घेऊन कायदेशीर पद्धतीने काम करण्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.

यावेळी पत्रकार गिरमल्ल गुरव, प्रभू पुजारी, अशोक सोनकंटले, शिवराज मुगळे, आरिफ शेख, महेश पवार, अभिजीत जवळकोटे, प्रमोद जवळकोटे, राहुल उड्डाणशिव, आनंद बिराजदार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नितीन वारे यांनी केले, तर आभार पत्रकार बबलू शेख यांनी मानले,

 

संपादक - गणेश मोरे  
संपादक - गणेश मोरे *सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी संबंधित, गुन्हेगारी, वैद्यकीय , व प्रशासकीय बातम्यांसाठी आपल्या हक्काच न्यूज चॅनेल - द महाराष्ट्र न्यूज* Read More
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon