संजय आरगडे व सतीश आरगडे यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धता
बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या संजय विलास आरगडे (वय ३१) आणि सतीश श्रीमंत आरगडे (वय ४४, दोघे रा. तावडी, ता. बार्शी) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, धोकादायक व्यक्ती व इतर विघातक कृत्या प्रतिबंधक अधिनियम, १९८१ अर्थात एम.पी.डी.ए. कायद्यान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पोलीसांच्या माहितीनुसार, दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मालमत्ता जबरदस्तीने हिसकावून घेण्याच्या उद्देशाने दुखापत करणे, घातक हत्यारांसह दंगा, महिलांशी गैरवर्तन व विनयभंग, रस्ता अडविणे, जिवे मारण्याची धमकी, फसवणूक तसेच बनावट कागदपत्रे तयार करून त्यांचा वापर करणे अशा विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दोघांच्या वारंवारच्या गुन्हेगारी व विघातक कृत्यांमुळे सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था व सुरक्षिततेला बाधा निर्माण होण्याची परिस्थिती असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यानुसार बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी एम.पी.डी.ए. कायद्याच्या कलम ३(१) अन्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सादर केला होता.
या प्रस्तावाची दखल घेत जिल्हादंडाधिकारी एस. कार्तिकेयन (भा.प्र.से.) यांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी दोघांविरुद्ध स्थानबद्धतेचे आदेश पारित केले. आदेशानुसार बार्शी शहर पोलिसांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेत कायदेशीर प्रक्रियेनुसार आदेशाची बजावणी केली. आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर दोघांना कडक पोलीस बंदोबस्तात येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले.
सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या तसेच वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक गणेश कुंभार व तत्कालीन पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली बार्शी शहर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली.



