सोलापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पहिल्यांदाच स्वीकृत सदस्य घेतले जाणार आहेत. प्रत्येकी दहा सदस्य मागे एक सदस्य असे त्याचे समीकरण आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकूणच सदस्य संख्या पाहता सात जिल्हा परिषद सदस्य स्वीकृत म्हणून येतील. त्यामध्ये चार भारतीय जनता पार्टी, एक शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस एक असे सदस्य येतील अशी चर्चा ऐकण्यास मिळते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले 10 सदस्य आहेत. त्यामुळे स्वीकृत म्हणून एका कार्यकर्त्याला संधी मिळेल. राष्ट्रवादी पक्षाकडून सध्या केवळ दोनच नावाची चर्चा आहे ती म्हणजे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम साठे यांची.
या दोन्ही नेत्यांनी आपला पारंपरिक मतदारसंघ सोडून दुसऱ्या गटात जिल्हा परिषद निवडणूक लढवली. बळीराम काका साठे यांचा पारंपारिक नान्नज जिल्हा परिषद गट ओबीसी साठी राखीव झाल्याने त्यांनी बीबी दारफळ गटातून निवडणूक लढवली मात्र एकूणच बदललेली राजकीय समीकरणे, तसेच दिलीप माने, अविनाश मार्तंडे विरोधात असल्याचा फटका त्यांना बसला. विद्यमान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी यांच्याकडून काका साठे यांना पराभूत व्हावे लागले. जिल्हा परिषदेच्या इतिहासात सर्वच पदे भोगणारे काका साठे यंदा मात्र पराभूत झाले.
तेव्हापासून ते आजपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये आलेले नाहीत.
दुसरीकडे हीच अवस्था जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची ही झाली. आपल्या नरखेड या जिल्हा परिषद गटातून ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते परंतु या निवडणुकीत त्यांनी आपला मतदारसंघ सोडून कुरूल जिल्हा परिषद गटात उभे राहिले. कार्यकर्त्यांनी त्यांना मतदारसंघ सोडू नये अशी विनंती केली मात्र पाटलांनी कोणाची ऐकले नाही. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढला होता. पुन्हा राजकीय समीकरणे बदलली. माजी आमदार राजन पाटील निवडणुकीच्या पूर्वीच भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. या ठिकाणी जकराया साखर कारखान्याचे चेअरमन सचिन जाधव यांना भाजप उमेदवारी दिली. राजन पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संपूर्ण ताकद या मतदारसंघात लावली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यानच अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला त्याचा फायदा उमेश पाटील यांना होईल असे वाटत होते पण झाले उलटे. सुमारे तेराशेच्या फरकाने उमेश पाटील यांचा पराभव झाला.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात माजी सभापती विजयराव डोंगरे आणि अतुल पवार हे दोन्ही सदस्य जुने आहेत. अतुल पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आहेत तसेच संजयमामा शिंदे यांची ही भूमिका या स्वीकृत सदस्य पदासाठी महत्त्वाची ठरणार आहे. उमेश पाटील यांना जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्य पद देऊन त्यांचे पुनर्वसन होऊ शकते ते सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या अतिशय जवळचे असल्याने त्यांचे नाव आघाडीवर दिसून येते. पवार यांच्या पोटनिवडणुकित उमेशरावांनी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडली होती. त्यामुळे विधान परिषदेसाठी त्यांच्या नावाची चर्चा होती पण आता जिल्हा परिषद सदस्य पद देऊन त्यांचे पुनर्वसन होऊ शकते.
दुसरीकडे ज्येष्ठ नेते काका साठे हे सुद्धा स्वीकृत सदस्य पदासाठी इच्छुक असल्याचे समजते. त्यांनीही तशी फिल्डिंग लावली आहे. सदस्य होऊनच विरोधकांच्या नाकावर टिच्चून झेडपीत पुन्हा पाय ठेवायचा असा चंग यांनी बांधल्याचा दिसतो. काका साठे हे सध्या वयाच्या 85 च्या घरात आहेत त्यामुळे पक्ष त्यांचे वय पाहता काय निर्णय घेतोय हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे राहणार आहे.




