नवख्यांना संधी, ज्येष्ठ आमदारांना डावलले? भाजपच्या कोअर कमिटीवरून सोलापुरात राजकीय चर्चा
सोलापूर पूर्व जिल्ह्यातील भाजपच्या नव्याने जाहीर करण्यात आलेल्या कोअर कमिटीमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नव्या चेहऱ्यांना आणि तुलनेने नवख्यांना कोअर कमिटीत स्थान देण्यात आले असताना, पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी आमदारांना मात्र डावलण्यात आल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. विशेषतः आमदार देशमुख आणि आमदार कोठे यांची नावे कोअर कमिटीच्या यादीत नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार जाहीर करण्यात आलेल्या या कोअर कमिटीत जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी, जिल्हा सचिव, केंद्र व राज्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्याची रचना करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष जाहीर झालेल्या यादीत काही नव्या आणि तुलनेने कमी अनुभवाच्या नेत्यांना स्थान मिळाले, तर दीर्घकाळ राजकारणात सक्रिय असलेल्या ज्येष्ठ आमदारांची नावे नसल्याने कार्यकर्त्यांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
देशमुख आणि कोठे यांना वगळणे हा पक्षाच्या नव्या राजकीय धोरणाचा भाग आहे का? की स्थानिक पातळीवरील बदलत्या समीकरणांचा हा परिणाम आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोअर कमिटी ही पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेतील केंद्रबिंदू मानली जाते. त्यामुळे या समितीतून कोणाला स्थान मिळते आणि कोणाला वगळले जाते, याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, नवख्यांना संधी देऊन पक्ष नवी फळी तयार करत आहे की ज्येष्ठ नेत्यांच्या प्रभावाला मर्यादा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे, याबाबत आता चर्चा रंगली आहे. या निर्णयामुळे पक्षातील अंतर्गत समीकरणे बदलण्याची शक्यता असून, आगामी काळात देशमुख आणि कोठे समर्थकांची भूमिका काय राहते, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




