शासकीय सेवा ही केवळ नोकरी नसून समाजाप्रती असलेली एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. ही
प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि संवेदनशीलतेने पार पाडत, गेली २४ वर्षांहून अधिक काळ आरोग्य व
वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय प्रशासकीय सेवा बजावणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. संजय धोंडीबा देशमुख. श्री. देशमुख यांनी ३ मार्च २००३
रोजी शासकीय सेवेत प्रवेश केला. कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ सहाय्यक, कार्यालयीन अधीक्षक आणि प्रशासकीय अधिकारी अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), सोलापूर तसेच डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे उल्लेखनीय कार्य केले आहे.

रुग्णांना वेळेवर व योग्य उपचार मिळण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सहकार्य करणे, ग्रामीण व तालुका स्तरावरून येणाऱ्या रुग्णांना मार्गदर्शन व मदत करणे, तसेच वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित प्रशासकीय कामकाजाचे प्रभावी नियोजन करण्यामध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून त्यांनी आपल्या सेवेला मानवी संवेदनशीलतेची जोड दिली. रक्तदान जनजागृती आणि रक्तदान शिबिरांच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेत त्यांनी समाजोपयोगी कार्यातही योगदान दिले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या रक्तपेढीमार्फत त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

MBBS, PG, UG तसेच इतर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रशासकीय कामकाजाचे यशस्वी नियोजन करताना
त्यांनी कार्यक्षम, पारदर्शक आणि रुग्णाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनामार्फत त्यांच्यावर प्रशासकीय अधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारीही सोपविण्यात आली. २४ वर्षांहून अधिक काळाची अखंड शासकीय सेवा, उत्कृष्ट नेतृत्व, जबाबदारीची प्रभावी अंमलबजावणी, रुग्णाभिमुख प्रशासन आणि समाजोपयोगी रक्तदान चळवळीतील सक्रिय योगदान याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून, साप्ताहिक ‘अनंत विचार’च्या
पाचव्या वर्धापन दिनानिमित्त श्री संजय धोंडीबा देशमुख यांना ‘उत्कृष्ट प्रशासकीय सेवा
पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.




