बारामतीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

बारामतीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

महसूल व वन विभागाच्या वतीनं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला उपस्थित राहून विविध शासकीय योजनांच्या लाभांचं वितरण करण्यात आलं. यावेळी कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर, हार्वेस्टर व कृषी विषयक इतर अवजारांचं, तसंच पंचायत समिती मार्फत सायकलींचं वितरण तसंच शिबिरातील विविध विभागांच्या स्टॉलला भेट दिली आणि वृक्षारोपणही करण्यात आलं.

मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीच्या औचित्यानं राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे शिबिर आयोजित करण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनानं घेतला असून, यावेळी स्वर्गीय अजितदादांना विनम्र अभिवादन करण्यात आलं.

ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल व इतर विभागांशी संबंधित प्रश्नांचं तातडीनं निराकरण करून प्रशासन अधिक पारदर्शक, गतीमान व लोकाभिमुख करण्याचा या शिबिरामागील उद्देश आहे.

बारामती ही आदरणीय अजितदादांची कर्मभूमी असून, त्यांनी घडवलेला विकासाचा वारसा पुढे नेणं हीच त्यांना खरी आदरांजली असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
आदरणीय अजितदादांच्या प्रयत्नातून बारामतीसाठी सुमारे ₹१८.८८ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून मजबूत शेत पाणंद रस्त्यांचं जाळं उभारण्याचं काम सुरू आहे. तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ₹५२३.२२ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. महसूल विभागानं १० दिवसांचा कृती आराखडा, अद्ययावत ७/१२, प्रधानमंत्री आवास योजना व इतर उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल संपूर्ण महसूल यंत्रणेचं अभिनंदन केलं.

यावेळी शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी तसंच शेतीमाल बाजारात पोहोचविण्यासाठी बारमाही शेतरस्ते आवश्यक असतात. बारामती तालुक्यातील मौजे पानसरेवाडी इथं शेतकऱ्यांच्या संमतीनं आज प्राथमिक स्वरूपात एक शेतरस्ता मंजूर करण्यात आला. त्यामुळं १५ एकर शेतीसाठी कायमस्वरूपी हक्काचा रस्ता उपलब्ध होणार आहे.
सुपा मंडळांतर्गत संमतीनं आणखी १०० शेतरस्ते तयार करण्यात येणार असून, ही एक सुरुवात आहे. त्यामुळं बारामती तालुक्यात वादविरहित शेतीला चालना मिळेल. “बारामती तालुका हा मजबूत पाणंद रस्ते – समृद्ध शेतकरी – विकसित महाराष्ट्राची नाभी ठरणार आहे,” असं अधोरेखित केलं. तसंच बारामतीसाठी ३० खाटांचं क्रिटिकल केअर ब्लॉक मंजूर झाल्याची आनंदाची माहिती देण्यात आली.

स्मार्ट व्हिलेज व इंटेलिजन्स व्हिलेज योजनेत महाराष्ट्रातील निवड झालेल्या ७५ गावांपैकी विक्रमी १० गावं बारामती तालुक्यातील आहेत. हे केवळ आदरणीय अजित दादांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झालं असल्याचं यावेळी नमूद केलं.
स्वर्गीय अजितदादांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ज्येष्ठ उद्योजक श्री. आर. एन. शिंदे यांनी वाघळवाडी आश्रमशाळेसाठी ₹५० लाख आणि ग्रामपंचायत इमारतीसाठी ₹२५ लाखांची देणगी जाहीर केली. त्यांचे यावेळी आभार मानले.

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडून सर्व धरणे शंभर टक्के भरली असून, जानाई-शिरसाई योजनेतून तालुक्यातील जलसाठे तातडीनं भरण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसंच जिल्हा परिषद सदस्य श्री. करणजी खलाटे यांनी मांडलेल्या Solid Waste Management प्रकल्पाबाबत सोमेश्वर कारखान्यानं जागा उपलब्ध करून दिल्यास वित्त आयोग अथवा स्वनिधीतून हे प्रकल्प तातडीनं मार्गी लावावेत, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे तसंच कारखाना प्रशासनाला देण्यात आल्या.

या अभियानातून हजारो महिलांची ‘महिला शेतकरी’ म्हणून नोंद झाली असून, जनतेला योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, त्यांचा वेळ व पैसा वाचावा आणि प्रशासन थेट जनतेच्या दारात पोहोचावं, हा शासनाचा उद्देश असल्याचं सांगितलं. शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता ते उद्याही सुरू ठेवण्याची विनंती प्रशासनाकडे करण्यात आली. तसंच या यशस्वी आयोजनासाठी सर्व अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, संस्था व आयोजकांचं अभिनंदन व आभार व्यक्त केले.

Admin  के बारे में
For Feedback - themaharashtranews27@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon