शिक्षणाबरोबरच संतांचे विचार आत्मसात करा – प्राचार्या स्वाती कणसे
द महाराष्ट्र न्युज टीम दौंड
दौंड (दि.16)हल्लीच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे आणि एकतेचा संदेश देणे ही काळाची गरज आहे. हा मानस समोर ठेऊन प्रशालेच्या प्राचार्या स्वाती कणसे यांच्या मार्गदर्शनाने शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कुल दौंड प्रशालेमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘दिंडीसोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थी आणि शिक्षकांनी पारंपारिक वेशभूषा करून या पवित्र दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला.शाळेच्या प्रांगणात सकाळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे पूजन प्रशालेच्या प्राचार्या- सौ. स्वाती कणसे , उप प्राचार्या लक्ष्मी रथ, पोदार प्रेप विभागाच्या हेड मिस्ट्रेस शकुंतला तोरस्कर या मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर दिंडी सोहळ्यामध्ये, विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीची भक्तिपूर्ण गाणी आणि अभंग व भक्तीगीते यांचे गायन करून उपस्थित सर्व भाविक व पालक यांना मंत्रमुग्ध केले.सदर दिंडी सोहळ्यामध्ये पर्यावरण रक्षणाचे महत्व सांगणारी वृक्षदिंडी तसेच ग्रंथांचे महत्व विषद करणारी ग्रंथ दिंडी , आरोग्य दिंडी अशा विविध संदेशपर दिंडिचे आयोजन सदर सोहळ्यामध्ये करण्यात आले होते. ही दिंडी प्रशालेच्या प्रांगणातून निघाली व पुणे सोलापूर महामार्गालगत असणाऱ्या वरवंड या गावातील, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नेण्यात आली. सदर दिंडी सोहळ्यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या तब्बल एक हजार विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांनी “ज्ञानोबा – माऊली तुकाराम” या जयघोषांमध्ये संपूर्ण वरवंड गावचा परिसर दुमदुमून टाकला . यावेळी दिंडीत सहभागी, वारकरी वेशभूषेतील मुली व मुले यांनी फुगडी खेळाचा आनंद घेतला.शेवटी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ज्ञानोबा माऊली व श्री विठ्ठल आरती घेऊन प्रसाद वाटप करण्यात आले या वेळी प्रशालेच्या प्राचार्या स्वाती कणसे यांनी यावेळी बोलताना आषाढी एकादशीच्या परंपरेचे महत्त्व स्पष्ट केले आणि वारकऱ्यांच्या भक्तीमय यात्रा, वारीचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून, संतांची शिकवण ही आपले जीवन खऱ्या अर्थाने चांगले बनवते असे प्रतिपादन केले. व सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. सदर दिंडी सोहळ्याचे आयोजन व नियोजन शालेय सांस्कृतिक विभागाने केले. यावेळी वरवंड गावातील ग्रामस्थ व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.