विद्यार्थ्यांनी सदैव आशावादी व प्रयत्नवादी राहून सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा- प्राचार्या स्वाती कणसे
द महाराष्ट्र न्युज टीम दौंड
दौंड.(दि.13) शहरातील ‘पोदार इंटरनॅशनल स्कुल’ ही प्रशाला प्रतिवर्षी विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक आणि समाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते. विद्यार्थ्यांच्या अंगी अभ्यासाबरोबरच, सामाजिक बांधिलकीचे बीज रुजले जावे हा मानस समोर ठेऊन प्रशालेच्या प्राचार्या स्वाती कणसे यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकीची जपणूक कशी करावी याचे अवलोकन करणारा ‘पोदार व्हॉलेटियर प्रोग्राम’ प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आला होता. सदर प्रोग्राम हा दरवर्षी आयोजित केला जातो. त्यामध्ये पर्यावरण रक्षण, प्लास्टिक निर्मूलन, परिवर्तन ड्राइव्ह, अनाथालय भेट , भारतीय जवानांना राखी आदी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्या अनुषंगाने चालू शैक्षणिक वर्षांमध्ये पोदार व्हॉलेटियर प्रोग्राम अंतर्गत कुरकुंभ तालुका दौंड येथील ‘अतुल कटारिया मेमोरियल ट्रस्ट, संचलित अविश्री बालसदन या अनाथालयास प्रशालेतील इयत्ता सहावी विद्यार्थी व शिक्षक यांनी सदिच्छा भेट दिली. यामध्ये तब्बल शंभर विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग दर्शविला. प्रशालेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या पाचशे विद्यार्थ्यांनी अनाथालयातील मुलांसाठी, कपडे, शालोपयोगी साहित्य, स्टेशनरी, वह्या, गोष्टीची पुस्तके, खेळणी, खाऊ, बॅग,इत्यादी वस्तू भेट स्वरूपामध्ये अविश्री बालसदन कुरकुंभ मधील मुलांना दिल्या. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी बालसदनातील मुलांशी त्यांची दिनचर्या व अभ्यास याबाबत सखोल चर्चा केली.तसेच त्यांच्या अंगी असलेल्या स्वावलंबी गुणांचे कौतुक केले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रशालेच्या प्राचार्या सौ.स्वाती कणसे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या आई वडिलांचा आदर व सन्मान करावा. जीवनाच्या प्रवासात कधीही जरी अपयश किंवा नैराश्य आले तर या सदनातील मुलांचे स्मरण करा.. यांच्याकडून प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील कोणाचाही आधार नसताना कसे जगावे उच्च शिक्षणाची भरारी कशी घ्यावी याचे बळ या मुलांकडून नक्कीच मिळेल असे सांगितले व जीवनात आलेल्या अपयशामुळे खचून न जाता नेहमी आशावादी व प्रयत्नवादी राहून सकारात्मक विचारसरणी ठेवावी असे प्रतिपादन केले. व पोदार प्रशाला अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमातून नक्कीच भविष्यातही बालसदनास मदत करेन अशी ग्वाही दिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल मोरे यांनी तर आभार स्वप्नील जुमडे यांनी व्यक्त केले. यावेळी अविश्री बाल सदन चे सर्वेसर्वा, अनिल कटारिया,व सर्व स्टाफ, उपप्राचार्या लक्ष्मी रथ, ऍडमिन विभागाचे प्रमुख स्वप्नील जुमडे, शिक्षक महेश मोरे,अतुल मोरे, शिक्षिका वृषाली माने तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.